Friday, October 26, 2018

आभास एक अभ्यास : Need Of Visual Astronomy


‘दृश्य' अर्थात जे आपल्या डोळयांना दिसतंय ते! मानवाला जगण्यासाठी आवश्यक असतात ती दृश्य. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा ह्याच एका क्षमतेमुळे वेगळा आहे. मानवी मेंदू आणि त्यात असणाऱ्या लाखो चेतापेशी आपल्याला त्या लायक बनवत असतात. व्हिज्युअल कॉर्टेक्स नावाचा भाग त्यासाठी जबाबदार आहे. कुणी म्हणेल अस्ट्रॉनॉमित आता हे न्यूरो सायन्स कुठून आलं? साहजिकच आहे कि समजा मानव ह्या विश्वात निर्माणच झाला नसता तर ह्याचा विश्वाला फारसा फरक पडत नाही किंबहुना आपण बघतो म्हणून विश्व आहे. म्हणजेच आपण आपल्या डोळ्यांनी जे विश्व बघतो,अभ्यासतो, त्यावर मोठमोठी पुस्तके लिहितो आणि ह्या विशाल अंतराळात फिरण्याची इच्छा व्यक्त करतो हेच फार मोठे जैविक आश्चर्य आहे. म्हणजेच थँक यू म्हणायचे तर ह्या शरीराला आणि मागच्या लाखो वर्षांच्या उत्क्रांतीलाच म्हणावे लागेल.
                  खगोलशास्रात मागील पाचशे वर्षात जी प्रगती झाली ती गॅलिलिओ च्या दुर्बिणीमुळे झाली.त्याआधी हजारो वर्षांपूर्वीच्या शून्य लाईट पोल्युशनच्या काळात जेव्हा अश्मयुगीन मानव आकाशात बघत असे तेव्हा त्याला ताऱ्यांमध्ये हरीण, गवा, साप, मासा इत्यादींसारखे प्राणी दिसायचे साहजिकच हे प्राणी त्याचे खाद्यपदार्थ होते. अश्मयुगीन गुहाचित्रांमध्ये सूर्याची,चंद्राच्या कलांची आणि ताऱ्यांच्या नक्षत्रांची चित्रे आढळून येतात. त्यानंतरच्या काळात मानवाने जी प्रगती केली त्यात रात्रीचा प्रवास,सागरप्रवास आणि ऋतु जाणून घेण्यासाठी त्याने नक्षत्रे योग्यप्रकारे जाणून घेतली. चिनी खलाशांनी पहिला जुना स्कायमॅप बनवला असावा असंही म्हणतात. हे शक्य झालं त्याच व्हिज्युअल कॉर्टेक्स मुळेच. ह्या व्हिज्युअल कॉर्टेक्स ची निर्मिती प्रकाश शोषून घेणाऱ्या एकपेशीय रिसेप्टर्स मुळे उत्क्रांत झाली होती. भरपूर प्राण्यांना डोळे नसतात आणि असले तरी खूप स्पष्ट त्यांना दिसत नाही काही प्राण्यांना मानवापेक्षाही चांगली दृष्टी आहे ती रात्रीही बघू शकतात पण मानव त्याला मिळालेली दृश्ये योग्य प्रकारे प्रोसेस करतो. मी एकदा सहज म्हणून गुगल वर सर्च केलं कि अंध व्यक्तींना स्वप्न पडतात का? कारण आपल्याला जी स्वप्ने पडतात ती आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात किंवा आपण काहीतरी वेडं-वाकडं काहीतरी कल्पित तरी असतो. पण इथे काही अंध व्यक्तींना डोळे नसतात पण व्हिज्युअल कॉर्टेक्स असल्यामुळे स्वप्ने हि पडतातच आणि हि स्वप्ने आवाजांची असतात चांगल्या आवाजांची किंवा भयंकर आवाजांची. हीच गोष्ट हे लक्षात आणते की कुठलीही गोष्ट करताना आणि समजूंन घेताना व्हिजुअलायझेशन हे गरजेचं आहे आणि खगोलशास्त्रात तर खूपच. वस्तू दिसत नसतानाही तिचं अस्त्रित्व अगदी अचूकपणे निर्माण करणे म्हणजे व्हिजुअलायझेशन.

गॅलिलिओ ने रेखाटलेले चंद्राचे बारकावे 

खगोलशास्रात क्रांती करणाऱ्या गॅलिलिओ ने दुर्बिणीतून गुरु, शनी आणि चंद्र ह्यांचे जे बारकावे पाहिले. ते त्याने नुसते पहिलेच नाही तर त्याचे वर्णन लिहिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने ते रेखाटले सुद्धा. गॅलिलिओ चा काळ हा रेनेसान्स काळ होता. लिओनार्डो द दा  विंची ने तर आपल्या सर्व कल्पना कागदावर उतरवल्या होत्या. कलेला त्या काळात खूप मान होता. गॅलिलिओ ने सुद्धा कला अवगत करून त्याच्या 'सिदेरस ननसिअस' ह्या पुस्तकात चन्द्राच्या सर्व बारकाव्यांचें चित्रण केले आहे. त्यानंतरच्या काळात चार्ल्स मेस्सीअर ने इतर आकाशगंगांचा अभ्यास करून चित्रे स्वतः रेखाटली. नंतर आयझॅक  न्यूटन ने रेफ्लेक्टिंग टेलिस्कोप चा शोध लावून बरीच कामे सोपी केली. Observational Astronomy मुळे विज्ञान हे मर्यादित न राहता लोकांपर्यंत पोहोचले जे लोक आधी टेलेस्कोप ला जादूटोणा म्हणून घाबरत ते टेलेस्कोप घेऊन निरीक्षण करायला लागले. सोळाशे ते सतराशेच्या काळात म्हणजे कॅमेरा चा शोध लागण्यापूर्वी भरपूर चित्रे रेखाटली गेली होती आणि ह्याचमुळे पाश्चात्य जगतात जणू काही क्रांतीच झाली होती. अठराव्या शतकात जेव्हा कॅमेराचा शोध लागला तेव्हा Observational Astronomy आणि आणि प्रसारमाध्यमांमध्ये क्रांती झाली आणि नंतरच भविष्य तुम्ही बघत आहातच.
                                      
कार्ल सेगन त्यांच्या कॉसमॉस ह्या सायन्स शो मधे
वरील सर्व इतिहासावरून एवढच लक्षात येतं कि कुठल्याही अभ्यासाला व शोधाला दृश्याची गरज आहे पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे ह्या सर्व गोष्टी अतिसामान्य लोकांपर्यांत पोहोचणे आणि विज्ञानाबाबत जागृती होणे. आज शैक्षणिक पातळीवर भरपूर दृश्य स्वरूपातील शिक्षण गरजेचे आहे. हे शिक्षण फक्त विध्यार्थी नाही तर वैज्ञानिकांनाही तेवढेच गरजेचे वाटते. जिथे आपण काही पाहूही शकत नाही अशा अणुशास्त्रात आणि पार्टीकल फिजिक्स मधेही सतत व्हिज्युअल्स ची गरज भासते. जेनेटिक्स मधले DNA ते अवयवशास्त्र. इतिहासात तर पुरातन च्या सांगाड्यांच्या आधारे संपूर्ण डायनासोर जिवंत करता येतो. कॉम्प्युटर ग्राफिक्स मधील क्रांती अगोदर म्हणजे अगदीच ३० ते ४० वर्षांपूर्वी शिक्षणामध्ये प्लास्टिक किंवा लाकडाच्या मॉडेल ने आपल्याला वस्तूचा प्रत्यक्ष त्रिमितीय अंदाज येत असे. केप्लर ने सुद्धा पृथ्वी सूर्या भोवती फिरते ह्याचे मॉडेल तयार केले होते. आजही मॉडेल वापरतात पण सर्वच डिजिटल झाल्याने कुठलीही कल्पना सत्यात उतरवणे आता शक्य झाले आहे. ऍनिमेशन आणि ग्राफिक्स मुळे विज्ञान अजून सोपे होईल असे वाटते पण आज मनोरंजनाचा फोफावलेला बाजार बघता त्यात विडिओ गेम्स आणि चित्रपटांची भयंकर भर पडली आहे. मनोरंजन वाईट नाही पण तेवढाच खर्च विज्ञानाच्या प्रसारासाठीही  व्हायला हवा. मागच्या ६० वर्षात ज्याही विज्ञानावर फिल्म्स आल्या त्यात विज्ञान शोधूनही सापडत नव्हते. अपोलो मिशन नंतर साय-फाय चा जमाना सुरु झाला एलियन्स वर भरपूर पुस्तके आली. ह्या सर्वांमुळे विज्ञानात व्हाईट कॉलर अंधश्रद्धा माजली. कारण खूप लोकांचे खऱ्या विज्ञानाकडून लक्ष हटले होते. हेच लक्ष्य परत आणण्यासाठी BBC ने पहिले पाऊल उचलले. त्यानंतर नॅशनल जिओग्राफिक सोसायटी आणि डिस्कवरी नेटवर्क. पहिली यशस्वी खगोलीय Documentary कार्ल सेगन ह्यांनी आणून पुन्हा खरे विज्ञान समोर आणले. ह्या सर्वानंतर मोठमोठाल्या प्रॉडक्शन हाऊसेस ला जाग आली आणि पहिला पुरेपूर वैज्ञानिक अंतराळपट 2001: Space Odyssey आला आणि विशेष म्हणजे ह्यामागेही कार्ल सेगन ह्याचाच हात होता. तोच सल्लागार होता आणि त्याला साथ लाभली ती स्टॅनली कुब्रिक ची. तरीही पुढल्या काळात विज्ञानाला टाळणाऱ्या फिल्म येऊ लागल्या होत्या पण तरीही डॉक्युमेंटरीज चा जमाना सुरु झाला होता. दिग्दर्शक स्पीलबर्ग ह्यांनी अनेक योग्य वैज्ञानिक फिल्म बनविल्या. ब्लॅकहोल सारख्या सेलिब्रिटी नटाला तर चांगले दिवस आले होते. तरीही ब्लॅकहोल फक्त गणितीय गोष्ट असल्याने तो कसा दिसतो हे कुणालाच माहित नव्हते. भरपूर आर्टिस्ट ने तो बनविण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण अपयश आले. शेवटी कॉम्पुटर सिम्युलेशन च्याआधारे त्याला चित्ररूप देण्याचा प्रयत्न केला गेला आणि अजूनही चालू आहे. पण २०१४ साली आताचे नोबेल लॉरेट कीप थॉर्न नावाच्या गुरुत्वलहरी अभ्यासकाने सामान्य लोकांना कृष्णविवर दाखवण्यासाठी  क्रिस्टोफर नोलन च्या फिल्म इंटरस्टेलर मध्ये चक्क vfx आर्टिस्ट आणि मोठ्या गणिती सिम्युलेशन्स ची मदत घेऊन स्पिनिंग ब्लॅकहोल ची निर्मिती केली. त्यासाठी त्यांना हजारो तासांचे रेंडरिंग आणि कित्येक कॉम्प्युटर्स चे चिपसेट लागले तेव्हा काही मिनिटांचा विडिओ तयार झाला ज्याला आजही सर्वात अचूक कृष्णविवर म्हटले जाते. ह्यांनंतर खरंच इतर वैज्ञानिकांनी प्रेरणा घेऊन पुढे प्रयत्न सुरु केले. हे पहिल्यांदाच असे नाही कि वैज्ञानिक  चित्रपट आणि पुस्तकांकडून शिकले. ह्या आधीही चेसली बॉन्स्टल ह्या कलाकाराकडून अनेक अंतराळतज्ञांनी प्रेरणा घेऊन space design बनवले आहेत.

क्रिस्टोफर नोलन दिग्दर्शित इंटरस्टेलर चित्रपटातील अचूक गणितीय ब्लॅकहोल

जगाचा विचार केला तर लक्षात येईल कि विज्ञानाकडे आवड म्हणून जाणारे खूप लोक आहेत पण आवड निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञासोबत चालले पाहिजे. भारतात अजूनही कुठले विज्ञानकेंद्रित यशस्वी असे टीव्ही चॅनेल नाही. आत्ताच इसरो ने विज्ञान चॅनेल आणण्याची घोषणा केली आहे. तेव्हा हे भारताचे पहिले विज्ञान चॅनेल होईल. तंत्रज्ञाना सोबत चालताना विज्ञान अधिकाधीक कसे सोपे होईल हा प्रयत्न झाला पाहिजे. आधी फक्त गेमिंग साठी आलेले तंत्रज्ञान अर्थात व्हर्चुअल रिऍलिटी आता विज्ञानात येत आहे. ऑग्यूमेंटेड रिऍलिटी मुळे आपण स्कायमॅप बघू शकतो. मंगळावर नसतानाही पण पृथ्वीवर बसून मंगळवार असल्याचा भास निर्माण करून शकतो. बीटलगीज तारा आपल्या सूर्यापेक्षा किती मोठा आहे  हे बघण्यासाठी आपल्यला ऍनिमेटेड विडिओ चीच गरज भासते. मानवी जीवनात दृश्याची गरज ही आवश्यक आहेच. भविष्य आभासी असेलच पण आजही दुर्बिणीतून शनी बघण्याचा आनंद हा वेगळाच आहे.

कीप थॉर्न दिग्दर्शक नोलन ह्यांच्या समवेत 


- रोशन शिंदे,
वैज्ञानिक चलचित्र भ्रान्तिकार
(Science Animator) 




No comments:

Post a Comment

  “This is such a terrifying experience,”  We can’t imagine the amount of pressure on those scientists who worked tirelessly over the years ...